नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमान! जयेंद्र पावरा आयआयएससी बंगलोरच्या विज्ञान संवर्धन कार्यक्रमात


 अक्कलकुवा प्रतिनिधी / ईलियास शेख 

अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी मास्टर जयेंद्र पावरा याची देशातील अग्रगण्य शिक्षण व संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगलोर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.

अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ११वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या जयेंद्र पावरा याची या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड झाल्याने शाळा व जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा विज्ञान संवर्धन कार्यक्रम विज्ञानावर आधारित एक महिन्याचा विशेष शैक्षणिक उपक्रम असून तो २७ एप्रिल ते ३० मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातील विविध राज्यांमधील आणि शाळांमधील निवडक प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची संधी, विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, नामांकित वैज्ञानिकांचे मार्गदर्शन तसेच संशोधन प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख करून दिली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातून प्रथमच मास्टर जयेंद्र पावरा याची निवड झाल्याने ही केवळ नवोदय विद्यालयासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नवोदय विद्यालय समितीच्या अध्यक्षा व जिल्हाधिकारी मिताली सेठी, विद्यालयाचे प्राचार्य विलास पाटील तसेच नवोदय विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post