नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/संदिप कोकणी:नंदुरबार,मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज संपन्न झाली. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांची प्रगती, सद्यस्थिती व अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेशा पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
१) जलजीवन मिशन योजनांचा भौतिक आढावा
जिल्हा परिषद व मजिप्रा मार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. पाइपलाइन टाकणे, जलाशय बांधकाम, फिल्टर प्लांट उभारणी तसेच वितरण व्यवस्थेतील प्रलंबित कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
२) घरगुती नळ कनेक्शन वाढविण्यावर भर
जिल्ह्यातील पात्र सर्व कुटुंबांना घरगुती नळजोडणी उपलब्ध व्हावी यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामपंचायत, जलसमिती व अभियंता शाखेतील समन्वय वाढवून सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.
३) धडगाव-अक्कलकुवा येथील बंद सोलर जलयोजना — तातडीचे निर्देश
धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील बंद सोलर जलयोजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. कार्यात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असून, सर्व योजना तात्काळ कार्यान्वित करण्यास सांगितले.
४) पूर्ण झालेल्या योजनांचे HGL सर्टिफिकेशन
भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या सर्व जलयोजनांचे HGL (Hydraulic Grade Line) सर्टिफिकेशन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रक्रियेमुळे योजना सुरक्षित, सक्षम आणि गुणवत्तायुक्त असल्याची खात्री होणार आहे.
५) स्रोत सस्टेनेबिलिटी कमिटी स्थापन
दीर्घकालीन जलसंवर्धन, पुनर्भरण व पाणी उपलब्धतेच्या टिकावासाठी जिल्हास्तरावर ‘सौर्स सस्टेनेबिलिटी कमिटी’ स्थापन करण्यात आली. ही कमिटी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणार आहे.
६) मिशन ‘जलबंधू’ अंतर्गत व्यापक चर्चा
ग्रामपातळीवर जनसहभाग वाढविणे, जलसाक्षरता मोहिमा राबविणे, युवक व स्वयंसेवकांच्या भूमिकेला बळकटी देणे याबाबत मार्गदर्शक चर्चा घेण्यात आली. जलव्यवस्थापनात सामुदायिक सहभाग हा महत्त्वाचा घटक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
ही आढावा बैठक जिल्ह्यातील जलव्यवस्थापनाच्या गती, पारदर्शकता व गुणवत्तेला नवे बळ देणारी ठरली असून, जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व सुरक्षित पाणी पोहोचवण्याच्या उद्दिष्टासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
