शहीद SPO विदीप जाधव यांच्या कुटुंबाला शासनाने पालकत्व द्यावे – मुख्यमंत्र्यांकडे भावनिक निवेदन

 


ठाणे  प्रतिनिधी / विशाल कुरकुटे

कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी अपघातात शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील SPO विदीप जाधव यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देऊन त्यांच्या परिवाराचे पालकत्व शासनाने स्वीकारावे, अशी कळकळीची मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिनेश बुचडे, दिपक तेली व विशाल कुरकुटे यांनी सादर केलेल्या निवेदनात शहीद विदीप जाधव यांच्या कुटुंबाची परिस्थिती मांडण्यात आली आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्यामुळे त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, १४ वर्षांची मुलगी व ७ वर्षांचा मुलगा असा परिवार पूर्णतः आधाराविना राहिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“शासनाने पुढाकार घेऊन या शहीद पोलिसाच्या कुटुंबाला विशेष आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारावी,” अशी भावनिक मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी शासन कायम उभे राहत आले आहे. त्याच विश्वासातून शहीद विदीप जाधव यांच्या कुटुंबाला न्याय व आधार मिळावा, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post