साक्रीत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी;आ.मंजुळाताई गावीत यांचे विश्वकर्मा सभा मंडप उभारणीचे आश्वासन...

 


साक्री प्रतिनिधी/ अकिल शहा: साक्री शहरात विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुक्याच्या आमदार सौ. मंजुळाताई गावीत उपस्थित होत्या. यावेळी भाडणे गावाचे सरपंच अजय सोनवणे, नगरसेवक पंकज मराठे, विजय भोसले, बाळा शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात आमदार मंजुळाताई गावीत यांनी साक्री शहरात विश्वकर्मा सभा मंडप उभारण्यासाठी आवश्यक सहकार्य व पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी नागपूर (वर्धाने) ता. साक्री येथील राजू मिस्तरी यांनी आपल्या अद्भुत कौशल्याचे दर्शन घडवत काचेच्या बाटलीमध्ये गुंफलेली खाट आमदार मंजुळाताई गावीत यांना भेट म्हणून प्रदान केली. या आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

विश्वकर्मा जयंती निमित्त सकाळी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते, तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक कुवर यांनी केले.

या प्रसंगी तालुक्यातील कासारे, सामोडे, सुरपान, शेवाळी आदी गावांतील विश्वकर्मा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन साक्री तालुका विश्वकर्मा संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post