नवापूर प्रतिनिधी / सुनिल वळवी
नवापूर तालुक्यातील परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वीट भट्ट्यांमुळे नागरिकांचे आरोग्य, शेती आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला असून याविरोधात बिरसा क्रांती दल संघटनेतर्फे नवापूर येथील नायब तहसीलदार श्री. मराठे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बहादुरसिंग वळवी (नंदुरबार), जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राजु वळवी (नंदुरबार), जिल्हा उपाध्यक्ष सुनील गावीत, जिल्हा सचिव अंकीत वळवी, सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड तसेच काकरपाडा (मडवान) येथील वनहक्क समितीचे अध्यक्ष बालमा वळवी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, अनेक वीट भट्ट्यांमध्ये विटा भाजण्यासाठी कोळसा, लाकूड, प्लास्टिक, चप्पल यांसारखे घातक साहित्य जाळले जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर, दुर्गंधी व विषारी वायू हवेत मिसळत आहेत. याचा थेट परिणाम लहान मुले, महिला, शेतकरी तसेच वाहनधारकांच्या आरोग्यावर होत असून श्वसनाचे आजार, दम्याचा त्रास, सतत खोकला, डोळ्यांची जळजळ व त्वचारोग वाढत आहेत.वीट निर्मितीसाठी सुपीक शेतीची माती मोठ्या प्रमाणात काढली जात असल्याने शेतजमीन नापीक होत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच भट्ट्यांतून निघणारी राख व घाण पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊन विहिरी, बोअरवेल व पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत.धक्कादायक बाब म्हणजे मौजे खांडबारा परिसरातील मौजे काकरपाडा,मौजे मेहंदीपाडा (पो. श्रावणी, ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथे सुरू असलेली वीट भट्टी पर्यावरण मंजुरी, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी व इतर कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून चालू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित वीट भट्टीवर तात्काळ बंदी घालावी, दोषींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी तसेच प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.तसेच सदर निवेदन प्राप्त झाल्यापासून योग्य ती कार्यवाही होईपर्यंत संबंधित वीट भट्टीचे काम तात्काळ थांबवावे, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.









