साक्री प्रतिनिधी/ अकिल शहा: निजामपूर पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल ९० गावांचा समावेश असलेल्या विस्तीर्ण व संवेदनशील परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे हे मोठे आव्हान असतानाही सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी आपल्या धाडसी, कर्तव्यनिष्ठ व लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे माळमाथा परिसरात कायद्याचा धाक निर्माण करत शांततेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
माळमाथा परिसरात सुझलॉन कंपनीचे मोठे पवन ऊर्जा प्रकल्प तसेच आशिया खंडातील महत्त्वाचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल वाढल्याने चोरी, फसवणूक व इतर गुन्हेगारी प्रकार वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक भामरे यांनी कठोर व प्रभावी कारवाई करत गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवले आहे.
भामरे यांनी केवळ गुन्हेगारी रोखण्यावर भर न देता नागरिकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. अनेक नागरिकांना कायद्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे गैरसमज निर्माण होत होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना कायद्याचे महत्त्व, अधिकार व कर्तव्य यांची स्पष्ट जाणीव झाली आहे.
सर्व धर्म समभाव जपत सामाजिक सलोखा टिकवण्यासाठीही भामरे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. विविध सामाजिक कार्यक्रम, धार्मिक सण व सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी समाजात विश्वास व ऐक्य निर्माण केले आहे.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताच मंत्रालयाच्या दालनात आल्याचा भास होतो, इतक्या सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने स्टेशनचा कायापालट करण्यात आला आहे. स्वच्छता, सुबक नियोजन आणि आधुनिक व्यवस्थापनामुळे नागरिकांवर सकारात्मक प्रभाव पडत असून पोलीस प्रशासनाची प्रतिमा अधिक उंचावली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन परिसर स्वच्छ व सुंदर बनवत त्यांनी स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. "झाडे लावा, झाडे जगवा" या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही त्यांनी दिला आहे.
निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असतानाही उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने भामरे यांनी प्रभावी नियोजन करत माळमाथा परिसरात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवली आहे.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्या प्रभावी व लोकाभिमुख कार्यपद्धतीचे जेष्ठ पत्रकार व समाजसेवक ताहीर बेग मिर्झा यांनी कौतुक करत त्यांना सलाम व्यक्त केला आहे.
