मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते आदिवासी भाषेला ‘डिजिटल अस्तित्व’! देशातील पहिला एआय प्रकल्प नंदुरबार जिल्हा प्रशासन विकसित 'अस्तित्व' मुंबईत लाँच...


मुंबई/प्रतिनिधी: साधी लिपीबद्धही न झालेल्या आदिवासी बोलीभाषेला डिजीटल जगात स्थान देणारा देशातील पहिला एआय प्रकल्प नंदुरबार जिल्हा प्रशासनाने विकसित केला आहे. 'अस्तित्व' (Astitva) असे नाव असलेल्या या प्रकल्पाचा अधिकृत शुभारंभ आज मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित अॅग्री. एआय समीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रकल्पामुळे आदिवासी भाषांना शिक्षण आणि कृषी क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.



आदिवासी बोलीभाषेतून शिक्षण देण्याबाबत देशभरात चर्चा सुरू असताना, नंदुरबार जिल्हा प्रशासनाने या भाषेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी हा अभिनव प्रकल्प हाती घेतला. एकूण ४० हजार वाक्यांचे आदिवासी बोलीभाषेत भाषांतर करण्यात आले असून, प्राथमिक टप्प्यात कृषी आणि शेतीविषयक संदर्भांना प्राधान्य देण्यात आले आहे. या वाक्यांची व्यापकता नियमितपणे वाढविण्यात येणार आहे. आदिवासी बोलीभाषेतील प्रमुख असलेल्या देहवाली भिली बोलीभाषेचा यात समावेश करण्यात आला आहे.



या प्रकल्पात 'एनएमटी' (न्यूरल मशीन ट्रान्सलेशन), 'टीटीएस' (टेक्स्ट टू स्पीच) आणि 'एएसआर' (ऑटोमॅटिक स्पीच रेकग्निशन) अशी आधुनिक एआय मॉडेल्स प्रथमच भिली भाषेसाठी विकसित करण्यात आली आहेत. डिजीटल डॅशबोर्डच्या माध्यमातून रोज योगदान देणाऱ्यांची संख्या, डेटा संकलनाची प्रगती आणि एकूण कामाची स्थिती रिअल टाइममध्ये पाहता येणार आहे. हे एआय मॉडेल 'भाषिनी' (Bhashini) प्लॅटफॉर्मद्वारे इंडिया एआय समीट, नवी दिल्ली येथे सादर करण्यात आले होते आणि आज मुंबईतील बीकेसी येथे त्याचा अधिकृत शुभारंभ झाला.



या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सुमारे ५०० स्थानिक बोलीभाषेतील तज्ज्ञांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मित्ताली शेट्टी आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे मुख्य संयोजक भिमसिंग वळवी, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी सामाजिक कार्यकर्ते कालुसिंग वळवी, लताताई वळवी, नरेंद्र पाडवी, दिनेश वळवी, प्रा.के. के. वळवी, जागृती वसावे, नीती आयोगाच्या क्षितिजा देशमुख, कार्याचे कमलेश महाले यांच्यासह कृषी विभागातील आदिवासी कर्मचारी तसेच कार्याची संपूर्ण टीम उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post