साक्री प्रतिनिधी /अकिल शहा:पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा, संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे. शेवाळी (दा.) ता. साक्री येथील अवघ्या सात वर्षांचा फरहान अकिल शहा याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून कुटुंबियांचा अभिमान वाढवला आहे. फरहान हा पत्रकार अकील शहा यांचा चिरंजीव व तसेच माजी ग्रा.प.सदस्य सादिक मोहम्मद शहा यांचा नातू आहे.
लहान वयातच धार्मिक संस्कार जोपासत फरहान ने पहाटेच्या सेहरीपासून संध्याकाळच्या इफ्तारपर्यंत पूर्ण दिवस रोजा पाळला. दिवसभर आनंदी चेहऱ्याने आणि कोणतीही तक्रार न करता त्याने हा रोजा पूर्ण केला. त्याच्या या जिद्दीचे आणि श्रद्धेचे परिसरात कौतुक होत आहे.
कुटुंबियांनी सांगितले की, “फरहान ने स्वतःहून रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या उत्साहामुळे आणि चिकाटीमुळे आम्हालाही आनंद व अभिमान वाटतो."रमजान महिन्यात लहान मुलांमध्ये धार्मिक संस्कार, शिस्त आणि संयम यांची जपणूक व्हावी, यासाठी फरहानचा हा पहिला रोजा प्रेरणादायी ठरत आहे.
