शहादा प्रतिनिधी / शेख अहमद
वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल, शहादा येथे भौतिकशास्त्र विभागातर्फे दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या “दृष्टीपासून परिणामापर्यंत: लिंगभेद कमी करून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितची पुनर्परिभाषा करणे” या जागतिक संकल्पनेनुसार संशोधनाधारित पोस्टर प्रदर्शन व सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित) क्षेत्रातील लिंग विषमतेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच संशोधन व नेतृत्व क्षेत्रात महिलांचे समतोल प्रतिनिधित्व अधोरेखित करणे हा होता. आरोग्य, संशोधन, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वैज्ञानिक उद्योजकता या क्षेत्रांमध्ये लिंगभेद कमी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड यांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे कौतुक करत वैज्ञानिक संशोधनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्राध्यापक वर्गानेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले. विज्ञान क्षेत्रातील महिलांचे सशक्तीकरण हे समावेशक आणि नवोन्मेषी भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
तृतीय वर्ष भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थिनी आकांक्षा कुलकर्णी, कल्याणी कोळी, रुपाली तावडे, सुवर्णा गिरासे, देवयानी मोरे, शैख मिसबाह नाज, प्रणाली पाटील, शितल ठाकरे आणि रुचिका कोळी यांनी दोन संशोधनाधारित पोस्टर सादर केले. पहिल्या पोस्टरमध्ये जागतिक व भारतीय स्तरावरील STEM क्षेत्रातील लिंग प्रतिनिधित्व, सांख्यिकीय विश्लेषण, रचनात्मक अडथळे तसेच महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दुसऱ्या पोस्टरमध्ये Marie Curie, Sunita Williams आणि Tessy Thomas यांसारख्या प्रेरणादायी महिला वैज्ञानिकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष भौतिकशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राध्यापक पठाण इरम फतेमा यांच्या समन्वयातून तसेच भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. बी. वाय. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. संजयजी जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव ताईसाहेब वर्षाताई जाधव, संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशुभाऊ जाधव आणि संस्थेचे समन्वयक श्री. संजय राजपुत यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला दाद दिली.
विज्ञान क्षेत्रात महिलांचे सशक्तीकरण आणि समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.





