साक्री प्रतिनिधी / अकिल शहा:
दि. १५ फेब्रुवारी रोजी फाल्गुन कृष्ण चतुर्दशी निमित्त शेवाळी (ता. साक्री) येथे महाशिवरात्री मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. ग्राम सुधार मंडळाच्या वतीने भद्रावती नदीकाठी असलेल्या मारुती मंदिरालगतच्या जागेवर प्रस्तावित महादेव मंदिराच्या उभारणीसाठी विधिवत भूमिपूजन करण्यात आले.
सकाळी नऊ वाजता अभिषेक व महापूजेनंतर भूमिपूजन सोहळा ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव लक्ष्मण साळुंके तसेच गावाच्या प्रथम नागरिक सरपंच मंगलाताई भदाणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी सरपंच व उपसरपंच, विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
दरम्यान, शेवाळी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त विशेष आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शिवध्वजारोहण, शिव प्रतिज्ञा, प्रसाद वाटप, तसेच शिवज्ञान जागृती व अध्यात्मिक संदेश देण्यात आले.
महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करताना ‘शिव आणि शंकर यातील फरक’, उपवासाचा खरा अर्थ, ध्यान साधना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व ज्ञान चिंतनिका ब्रह्मकुमारीस कविता दीदी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संदेश पत्रिका व प्रसादाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच मंगलताई भदाणे, यादवराव साळुंके, सुरेश साळुंके, धनाजी साळुंके, गबाजी साळुंके आदी मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने शेवाळी गावात धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक वातावरणाची सुंदर सांगड घालत भक्तीमय उत्साहात कार्यक्रम पार पडले.

