अंबरनाथ प्रतिनिधी /विशाल कुरकुटे
अंबरनाथ–कल्याण लोकलमध्ये एका गर्भवती महिलेची कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना सुरक्षित प्रसूती करून घेत माणुसकीचा आदर्श घालून देणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांचे अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.
लोकल प्रवासादरम्यान एका २३ वर्षीय गर्भवती महिलेला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर डब्यात एकच गोंधळ उडाला होता. अशा अत्यंत संवेदनशील आणि तणावपूर्ण परिस्थितीत महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांच्या मदतीने लोकल डब्यातच सुरक्षित प्रसूती करून घेतली. त्यांच्या धाडसी आणि माणुसकीपूर्ण कृतीमुळे आई व नवजात बाळाचे प्राण वाचले.
या घटनेचे सर्वत्र कौतुक होत असून समाजातील विविध घटकांकडून सोनाली नंदेश्वर यांचा सन्मान करण्यात येत आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात आयोजित सत्कारप्रसंगी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत, स्टेशन मॅनेजर रामेश्वर मीना, सामाजिक कार्यकर्ते विशाल कुरकुटे, मनोज जैन, मंगेश मगरे यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी सोनाली नंदेश्वर यांच्या धैर्य, कर्तव्यनिष्ठा व समाजभानाचे विशेष कौतुक करत, “अशा अधिकाऱ्यांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी असून खाकीतील माणुसकीचा हा आदर्श आहे,” असे मत व्यक्त केले.

