अंबरनाथ प्रतिनिधी : विशाल कुरकुटे
अंबरनाथ ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक अद्भुत, थरारक आणि हृदयस्पर्शी घटना घडली आहे. प्रवासादरम्यान एका २३ वर्षीय गर्भवती महिलेला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याने लोकल डब्यात एकच गोंधळ उडाला.
प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना, याच वेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत, धैर्य, अनुभव आणि माणुसकीच्या बळावर लोकल डब्यातच सुरक्षित प्रसूती करून घेतली.
महिलेने गोंडस कन्येला जन्म दिला. नवजात बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकताच संपूर्ण लोकल डब्यात आनंद आणि दिलास्याची लाट उसळली. काही क्षणांसाठी प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी समाधान आणि आनंद दिसून आला.
यानंतर तत्काळ लोकल थांबवून आई व बाळाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांच्या या धाडसी, मानवतावादी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, “पोलीस म्हणजे फक्त कायदा नाही, तर माणुसकीचा आधार” हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.


