बदलापूर / प्रतिनिधी
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्था (रजि.) यांच्या वतीने सामाजिक, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे विशाल शांताराम कुरकुटे यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
पत्रकार, लेखक, संपादक तसेच समाजसेवक म्हणून विविध माध्यमांतून समाजजागृतीचे कार्य सातत्याने करणाऱ्या विशाल कुरकुटे यांनी वर्तमानपत्र, न्यूज पोर्टल व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न प्रभावीपणे मांडत सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद केला आहे. त्यांच्या निर्भीड, प्रामाणिक व सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या गौरवामुळे आगामी काळातही सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विशाल कुरकुटे यांनी व्यक्त केली.
जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ म. तिरपणकर व सचिव सविता भंडारी यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास सामाजिक, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
