नवापूर बाजार समितीत अविश्वास प्रस्ताव दुसऱ्यांदाही फसला ;बकाराम गावितांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब; समर्थकांचा जल्लोष

 




नवापूर प्रतिनिधी/ समीर पठाण:

नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांच्याविरोधात एका वर्षात दुसऱ्यांदा आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव अखेर आवश्यक गणपूर्ती न झाल्याने निष्फळ ठरला. या घटनेमुळे बाजार समितीतील राजकीय वातावरण तापले असले तरी सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

बाजार समितीची एकूण सदस्यसंख्या १८ असून त्यापैकी १७ सदस्य निवडून आलेले आहेत, तर एक जागा रिक्त आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सदस्य नवलसिंग सिंगा गावित यांच्या निधनामुळे सदस्यसंख्या कमी झाली होती. एकूण १३ सदस्यांनी दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.

मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या दि. २२ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार शुक्रवार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली. ही सभा प्राधिकृत निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नवापूर येथील अधिकारी सागर गवंड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सुरू झाली.

विशेष सभेसाठी ३० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, या कालावधीत केवळ दोनच सदस्य — भालचंद्र गावित व रमीला दिलीप गावित — उपस्थित राहिले. आवश्यक गणपूर्ती पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम २३-अनुसार सभा तहकूब करण्यात आली आणि अविश्वास प्रस्ताव आपोआप बारगळला.

या घटनेमुळे बाजार समितीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला असून सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त झाल्याचे दिसून येत आहे. अविश्वासाचा प्रयत्न दुसऱ्यांदाही अपयशी ठरल्याने विरोधकांच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्ष जयवंत जाधव, गटनेते नरेंद्र नगराळे, नगरसेवक धमेंद्र पाटील, भालचंद्र गावित, मनोहर नगराळे, के. टी. गावित, महेंद्र चव्हाण, राजू गावित, रणजीत गावित आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.


Post a Comment

Previous Post Next Post