शिक्षण, समाजकार्य व जनजागृतीत भरीव योगदान : महेश पाटील यांना राज्यस्तरीय 'दर्पण रत्न' पुरस्काराने सन्मानित...

 



मलकापूर प्रतिनिधी/प्रफुल्ल साने:

हिंदी मराठी पत्रकार संघ, मलकापूर यांच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ यंदा सामाजिक कार्यकर्ते महेश मोतीलाल पाटील यांना जाहीर करण्यात आला.

दि. ६ जानेवारी रोजी मराठा मंगल कार्यालय, मलकापूर येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात सहा. माहिती आयुक्त, मंत्रालय मुंबई, मा. निलेश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महेश पाटील यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, सुवर्ण पदक व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. अनिल खर्चे, हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनाश्रीताई काटीकर पाटील, उद्योजक बाळासाहेब दामोदर, सुभेदार दिनेश तायडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.



महेश पाटील यांनी समाजकार्याची पदव्युत्तर पदवी घेतली असून गेल्या १२ वर्षांपासून धुळे व नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, युवक-युवती विकास, महिला व बालकल्याण, मतदान जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, वृक्ष दिंडी, राष्ट्रीय एकात्मता, एड्स जनजागृती, हुंडाबळी विरोध, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट-गाईड शिबिरे, तसेच धुळे कारागृहातील कैद्यांसाठी गांधी विचार परीक्षा व महामानवांच्या जीवनकार्यावर आधारित परीक्षांचे आयोजन केले आहे.

माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी वापरातून त्यांनी शासकीय कार्यालयांतील अनागोंदी कारभारावर अंकुश ठेवत अनेक गोर-गरिबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. महाविद्यालयीन तसेच किशोरवयीन युवक-युवतींसाठी समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

महेश पाटील हे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र), उत्तर महाराष्ट्र प्रमुख – अखिल भारतीय कला साहित्य संस्कृती अकादमी (वर्धा), अध्यक्ष – धुळे महानगर युवा संसद, कार्याध्यक्ष – बेरोजगार क्रांती महासंघ, सरचिटणीस – ओबीसी शिक्षक पालक संघटना, जनसंपर्क अधिकारी – मी धुळेकर संघटना, सदस्य – अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी अनेक संस्थांवर कार्यरत आहेत.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार, राष्ट्रीय राजीव गांधी इंडिया गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार, खान्देश सेवा कृतज्ञता पुरस्कार, राज्यस्तरीय दक्ष नागरिक पुरस्कार, राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, महात्मा फुले स्मृती पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्योजक विजय वेदमुथा, निरंजन भतवाल, महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, राज्य उपाध्यक्ष चंद्रभान कोलते, नैसर्गिक मानव अधिकार फोरमचे गोरख देवरे, साहेबराव वाघ, किरण धुमाळ यांच्यासह धुळे व नाशिक येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post