दोंडाईचा येथील अशोक नगर घरकुल झोपडपट्टी परिसरात रात्री दहा वाजल्यानंतर नशेखोर, टवाळखोर व गंजळे प्रवृत्तीच्या लोकांचा उपद्रव वाढलेला असून, यामुळे परिसरातील शांतता भंग होत आहे. नागरिकांनी अशा लोकांना समज देण्याचा प्रयत्न केल्यास ते वाद घालतात, धमकी देतात, परिणामी कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
परिसरात महिला, वृद्ध नागरिक व लहान मुले वास्तव्यास असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. अनेक वेळा आरडाओरडा, शिवीगाळ व संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे रात्री दहा वाजेनंतर अशोक नगर घरकुल झोपडपट्टी परिसरात पोलीस पेट्रोलिंगची गाडी नियमित गस्तीसाठी पाठवावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.निवेदन देतेवेळी जहूर शेख , संजुम खाटीक, मुजाहिद शाह व सिद्दीकी तेली यांनी पोलीस निरीक्षक यांना दिले आहे की,पोलीस गस्तीमुळे नशेखोर व समाजकंटकांवर आळा बसेल तसेच परिसरात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पोलीस प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

