शहादा प्रतिनिधी/सोनू गावीत
शहादा तालुक्यातील शहाणा, कन्साई, वडगाव व नागझिरी येथील एकूण २८ प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढावेत, या प्रमुख मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी शहादा येथील वनभवन समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबतचे निवेदन उपविभागीय वन अधिकारी शहादा तसेच पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले आहे.
यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, मुन्ना पावरा, अजित वळवी, रविंद्र पटले, पप्पू अवाया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी शहादा यांनी दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सहायक वनसंरक्षक शहादा यांना दिलेल्या पत्रानुसार, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ (२०१२ सुधारणा) अंतर्गत मूळ वनदाव्यांची तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह स्वाक्षरी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मात्र, १ वर्ष ११ महिने इतका दीर्घ कालावधी उलटूनही शहादा तालुक्यातील २८ वनदाव्यांबाबत अभिप्राय प्राप्त झाले की नाहीत, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. परिणामी, संबंधित वनदावेदार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना तसेच इतर विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत.
वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने वनदावेदारांवर अन्याय होत असून, हा अन्याय दूर करण्यासाठीच ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे, असे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात सर्व वनदावेदार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


