स्त्री शिक्षणाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सलाम — सत्यशोधक महिलांचा नवापूर ते शिंदखेडा पर्यंत निर्धार...

 



नंदुरबार/प्रतिनिधी :भारतीय स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक महिला सभा यांच्या वतीने नवापूर, खांडबारा, नंदुरबार व शिंदखेडा येथे विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय व शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी सावित्रीबाईंनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.


पुरुषसत्ताक, मनुवादी व अन्यायकारक व्यवस्थेविरोधात सावित्रीबाईंनी उचललेला क्रांतिकारी विचार आजच्या काळात अधिक प्रखरपणे पुढे नेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महिला, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी संघटित संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही या कार्यक्रमात करण्यात आला.

कार्यक्रमास सत्यशोधक महिला सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांचा विचार आणि वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला.

“शिक्षीत बना, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा सावित्रीबाई फुले यांचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे, असे उपस्थितांनी ठामपणे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post