३० शाळांचा सहभाग, मैदान गाजले; सिसा–वडफळीपाडाने पटकावले प्रथम क्रमांक...





धडगाव प्रतिनिधी / कुवरसिंग पराडके 

शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ अंतर्गत सिसा केंद्राअंतर्गत आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिसा–वडफळीपाडा येथे दि. ६ व ७ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. चित्ते साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती धडगाव) यांनी भूषविले. केंद्रप्रमुख मा. श्री. अनिल पाडवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धिरसिंग वसावे यांनी केले.



या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत सिसा केंद्रांतर्गत येणाऱ्या तब्बल ३० जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी भव्य क्रीडांगण व आकर्षक मंच उभारण्यात आला होता. कार्यक्रमाला जिल्हा परिषद नंदुरबारचे सभापती, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहिल्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये जि.प. उच्च प्राथमिक शाळा सिसा–वडफळीपाडा यांनी खो-खो, कबड्डी व रस्सीखेच या सर्वच प्रकारात मोठ्या व लहान गटात मुले व मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून वर्चस्व सिद्ध केले. तसेच वैयक्तिक धावण्याच्या स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशामागे पदोन्नती मुख्याध्यापक श्री. जर्मनसिंग वळवी सर, प्रा. उमरसिंग वळवी सर, प्रा. सूर्यवंशी सर, प्रा. खैरनार सर, प्रा. लालसिंग वळवी सर, प्रा. पराग गावित सर, प्रा. किसन वळवी सर, प्रा. सुरेश पटले सर, प्रा. संपत ठाकरे सर, प्रा. दारासिंग ठाकरे सर, प्रा. मगन वळवी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः कोच म्हणून प्रा. लालसिंग वळवी सर यांनी विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण दिले.

या यशाबद्दल संपूर्ण सिसा केंद्रातील सर्व शिक्षकांनी जि.प. उच्च प्राथमिक शाळा सिसा–वडफळीपाडा यांचे अभिनंदन केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सागर गावित, पालकवर्ग व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यानेच हे यश शक्य झाले, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post