साक्री प्रतिनिधी/ अकिल शहा: २६ जानेवारी सोमवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेवाळी (दा.) ता.साक्री येथील शांतीवन बहुउद्देशीय संस्थेत ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे अतिशय उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. देशाप्रती असलेली निष्ठा आणि आदराची भावना या कार्यक्रमातून दिसून आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.दादासाहेब अरुणजी नेरकर होते त्यांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. व तसेच व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. साहेबराव लक्ष्मण साळुंके (मोठा भाऊ) उपस्थित होते.
तसेच शांतीवन प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. रोहित खैरनार सर, शांतीवन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री.वळवी सर, आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक व कर्मचारी वर्ग,मान्यवर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि कौतुक
याप्रसंगी शांतीवन फार्मसी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर विषयांवर प्रभावी भाषणे दिली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. संस्थेचे अध्यक्ष आणि प्राचार्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले.
अध्यक्षांचे मनोगत आणि गीतगायन
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दादासाहेब नेरकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केवळ भाषणापुरते मर्यादित न राहता त्यांनी स्वतः एक सुंदर देशभक्तीपर गीत सादर केले, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली आणि उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिंदे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.करण पाडवी सर, जाधव सर, कुवर सर, ससले सर, रोशनी मोहिते मॅडम, योगिता मोहिते मॅडम, भाऊसाहेब हातागळे, विनोद निकम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
