नंदुरबार/ प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिका सुमारे तीन वर्षे प्रशासकाच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर आज नंदुरबार नगरपालिकेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. या पार्श्वभूमीवर आयोजित पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.
या महत्त्वाच्या बैठकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (मजलिस) पक्षाचे गटनेते सैय्यद रफअत हुसैन यांच्यासह मजलिसच्या चारही नगरसेवकांनी अत्यंत तटस्थ व संतुलित भूमिका घेत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, मजलिसने ना शिंदे गटाला पाठिंबा दिला, ना भारतीय जनता पक्षाला, यामुळे पक्षाची स्वतंत्र व तत्त्वनिष्ठ राजकीय भूमिका अधोरेखित झाली.
मतदान प्रक्रियेत सहभागी न होताही दिवसभर नगरपालिका परिसरात मजलिसचे चारही नगरसेवक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. पारंपारिक व दिमाखदार शेरवानी परिधान करून केलेली त्यांची एन्ट्री ही उपस्थित सर्वांच्या नजरा खिळवणारी ठरली. या आगळ्या-वेगळ्या वेशभूषेमुळे मजलिसची स्वतंत्र राजकीय ओळख अधिक ठळकपणे समोर आली.
उल्लेखनीय बाब म्हणजे, यावेळी झालेल्या नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत मजलिसने सहा उमेदवार रिंगणात उतरवले होते, त्यापैकी चार उमेदवार विजयी होऊन नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. नगरपालिकेतील ही मजलिसची उपस्थिती येणाऱ्या काळात प्रबळ, जबाबदार व जनहिताकडे लक्ष देणाऱ्या विरोधी अथवा स्वतंत्र भूमिकेचे संकेत देणारी ठरत आहे.
नंदुरबारच्या स्थानिक राजकारणात मजलिसची ही ठाम व तटस्थ भूमिका आगामी निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
