शहादा तालुका प्रतिनिधी/शेख अहमद
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून ‘तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ मिळवलेल्या प्रा. धनराज चंद्रकांत अहिरे सर यांचा अब्दुलखालिक एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनतर्फे सत्कार करून गौरव करण्यात आला. समाजघडणीत शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, अशा गुणवंत शिक्षकांचा सन्मान होणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रा. अहिरेसरांची निवड त्यांच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन, सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्यामुळे करण्यात आली आहे. शिक्षणाबरोबरच समाजात समता, बंधुता व मूल्याधिष्ठित विचार रुजविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.या गौरवप्रसंगी अब्दुलखालिक फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री. खलीक जसीम शेख यांनी प्रा. अहिरे सरांचे अभिनंदन करत सांगितले की,“अशा समर्पित शिक्षकांमुळेच समाजात सकारात्मक बदल घडतो. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नाहीत, तर पिढी घडविणारे शिल्पकार आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.”
सत्कार समारंभात फाउंडेशनच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन प्रा. अहिरे सरांचा सत्कार केला. या वेळी प्रा. आहेर सरांनीही फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, शिक्षण क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास फाउंडेशनचे सदस्य साकिब शाह, आज़म तेली, अल्तमाश बगवान, नोमान मंसुरी, तसेच युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रा. अहिरे सरांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त केली.
अब्दुलखालिक एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनतर्फे भविष्यातही शिक्षण, सामाजिक न्याय आणि गुणवंत व्यक्तींच्या सन्मानासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
