दहिवेल, ता. साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:
दहिवेल येथे सत्यशोधक महिला सभेच्या वतीने मनुस्मृती ग्रंथ दहन करून स्त्री मुक्ती दिन मोठ्या उत्साहात व लढाऊ भूमिकेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मनुवादी विचारसरणीविरोधात तीव्र संघर्ष छेडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कॉम्रेड शीतल गावीत व सुचिला ताई मावळी यांनी सांगितले की, मनुस्मृतीने स्त्रियांना गुलाम बनवले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा ग्रंथ जाळून स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. आज स्त्रिया विविध क्षेत्रांत अग्रस्थानी आहेत; मात्र सध्याचे मनुवादी सरकार पुन्हा एकदा गुलामी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशभरात मनुवादी शक्तींमुळे महिलांवर, लहान मुलींवर अन्याय-अत्याचार वाढत असून अशा गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. आदिवासी व दलित समाजावर होणारे अत्याचार वाढले असून धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण केली जात आहे. जल-जंगल-जमीन भांडवलदारांच्या घशात घालण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.
भारत हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सत्यशोधक महिला सभा रस्त्यावरची व कागदावरची दोन्ही लढाई लढत राहील, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला कॉम्रेड शीतल गावीत, सुचिला ताई मावळी, गेवाबाई गावीत, लालबाई भोये, इमाबाई, निबाबाई ब्राम्हणे, पवित्रा ताई सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. विशेष उपस्थिती म्हणून कॉम. आर. टी. गावीत (सत्यशोधक शेतकरी सभा, नंदुरबार जिल्हाध्यक्ष), सेक्रेटरी रणजित गावीत (धुळे जिल्हाध्यक्ष), यशवंत माळचे, मणसाराम पवार, रामलाल गवळी, दिलीप ठाकरे, राकेश भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद पवित्राबाई सोनवणे यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन रवींद्र बागुल यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मनुस्मृती ग्रंथ दहन व महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
“मनुस्मृती मुर्दाबाद”, “स्त्री मुक्ती दिनाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रमाची सांगता महात्मा ज्योतिराव फुले रचित सत्याचा अखंड गायनाने करण्यात आली.


