नंदुरबार प्रतिनिधी /कुवरसिंग पराडके
राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने बोगस व दोषी दिव्यांग कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाकडून वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नाईलाजाने दि. १९ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात मा. मिताली शेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महासंघाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
१) श्री. नरेशचंद्र जोशी यांच्यावर दिव्यांग कायदा २०१६ च्या कलम (९१) नुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी.
२) महासंघाचे पदाधिकारी डॉ. मंगेश वाघमारे यांच्यावर अन्याय करून मानसिक त्रास देणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
३) सर्व शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची मेडिकल फेरतपासणी करण्यात यावी.
४) स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत दिव्यांगांचा हक्काचा ५% निधी वितरित करण्यात दिरंगाई करणाऱ्या दोषींवर शिस्तभंग व दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करावी.
५) दिव्यांग कायदा २०१६ संदर्भात कार्यशाळा आयोजित करून ठोस अंमलबजावणी करण्यात यावी.
६) तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत दिव्यांगांसाठी रात्र निवाऱ्याची उभारणी करावी.
७) स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना गाळे उपलब्ध करून द्यावेत.
८) खासदार व आमदार निधीतून दिव्यांगांचा हक्काचा निधी विनियोग करण्यात यावा.
९) सर्व शासकीय व निमशासकीय इमारतींचे एक्सेस ऑडिट करून चौकशी समिती नेमण्यात यावी.
या निवेदनावेळी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे श्री. शिवाजीराव मोरे (राज्य उपाध्यक्ष), श्री. राजाभाऊ कुवर (जिल्हाध्यक्ष), श्री. मंगेश वाघमारे (कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष), श्री. कुवरसिंग पराडके (जिल्हा कार्याध्यक्ष) आणि श्री. अरविंद शिंदे (जिल्हा उपसरचिटणीस) उपस्थित होते.
प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

