शहादा प्रतिनिधी /कुवरसिंग पराडके:
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पहिले दिव्यांग आधार कार्ड अपडेट शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले. राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने आणि कर्तव्यदक्ष मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी साहेब यांच्या आदेशान्वये या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिव्यांग व्यक्तींना शारीरिक आजारांमुळे हातांचे ठसे उमटत नसणे, डोळे स्थिर न राहणे अशा समस्यांमुळे आधार कार्ड अपडेट करण्यात अडचणी येत होत्या. परिणामी ते शासनाच्या विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत होते.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाने हा विषय थेट मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी साहेब यांच्या निदर्शनास आणून दिला. विषयाचे गांभीर्य ओळखून मा. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आधार केंद्र प्रमुख मा. जयेश खैरनार साहेब यांना आवश्यक आदेश देत हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार शहादा येथील प्रकाशा रोडवरील जिल्हाध्यक्ष श्री. राजाभाऊ कुवर यांच्या कार्यालयाजवळ हे शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात शहादा तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांचे आधार कार्ड यशस्वीरित्या अपडेट करण्यात आले. शिबिरासाठी सेतू केंद्र संचालक श्री. संदीप नाना बिराडे यांचेही विशेष सहकार्य लाभले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष श्री. शिवाजीराव मोरे, कायदेशीर सल्लागार अॅड. दिनेश महिरे, जिल्हाध्यक्ष श्री. राजाभाऊ कुवर, श्री. अरविंद शिंदे, सौ. सुनिताताई कुवर, श्री. सुदाम लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरामुळे दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भविष्यात अशा अधिक शिबिरांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
