गंगापूर (विसरवाडी) प्रतिनिधी/ समीर पठाण
धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या बेजबाबदार, नियमबाह्य आणि निष्काळजी रस्ते कामामुळे आज एक भीषण दुर्घटना घडली. कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता सुरू ठेवलेले काम अखेर तीन तरुणांच्या आयुष्यावर बेतले. या हृदयद्रावक घटनेत दोघा तरुणांचा मृत्यू झाला असून एक युवक मृत्यूशी झुंज देत आहे.
महामार्गावर काम सुरू असताना आवश्यक असलेली बॅरिकेड्स, सूचना फलक, प्रतिबिंबित चिन्हे व प्रकाश व्यवस्था यापैकी एकही उपाययोजना प्रत्यक्षात दिसून आली नाही. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, ठेकेदाराने अनेक दिवसांपासून नियमांना पायदळी तुडवत मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवले होते.
प्राप्त माहितीनुसार, कोणतीही पूर्वसूचना नसल्याने दुचाकी क्रमांक MH 39 AS 0102 वरील तरुणांना रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज आला नाही आणि दुचाकी थेट रस्ते रोलरवर आदळली. धडक इतकी भीषण होती की अमित जयंत गावित (रा. गंगापूर) याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला अक्षय अशोक वसावे याचा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तनिष संदीप वसावे हा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच नाळीज धाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे की, अपघातानंतर मदत मिळते; पण अपघात टाळण्यासाठीची व्यवस्था कुठे आहे?
या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नागरिक संतप्त शब्दांत सांगत आहेत —
“हे अपघात नाहीत, हे दुर्लक्षातून घडलेले मृत्यू आहेत.”
“नियम कागदावरच राहिले आणि तरुणांचे प्राण गेले.”
काम सुरू असताना कडक सुरक्षा उपायांची सक्ती, नियम मोडणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने कठोर कारवाई आणि जबाबदारी निश्चित करण्याची ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यातील दुर्घटनांची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवरच येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
