मौजे मंगी (बू), ता. राजुरा, जि. चंद्रपूर |प्रतिनिधी
शेतकरी-तरुणांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून चंद्रपूर जिल्ह्यातील मंगी (बू) हे आदिवासी गाव आज ‘आदर्श गाव’ म्हणून ओळख निर्माण करत आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, रस्ते, आरोग्य सुविधा आणि पर्यावरण संवर्धन अशा सर्वच बाबींमध्ये या गावाने उल्लेखनीय प्रगती साधली असून इतर गावांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरत आहे.
पूर्वी भकास व दुर्लक्षित अवस्थेत असलेले मंगी (बू) गाव आज विकासाच्या मार्गावर वेगाने आगेकूच करत आहे. गावात स्वच्छ व सुस्थित रस्ते, पक्क्या नाल्या, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हिरवळीने नटलेले बगीचे तसेच ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ओपीडी (OPD) सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सर्वसमावेशक विकासकार्याची दखल घेत मंगी (बू) गावाला राज्यस्तरीय आदर्श गाव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हे यश गावातील एकोपा, लोकसहभाग आणि प्रभावी स्थानिक नेतृत्वाचे फलित आहे.
या विकासात गावचे सरपंच श्री. शंकर तोडसे साहेब तसेच ग्रामसेविका मॅडम नंदिनी कोरते यांचे मोलाचे योगदान लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाने नियोजनबद्ध विकासाची दिशा घेतली आहे. ग्रामस्थ, शेतकरी आणि तरुणांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मंगी (बू) गावाने आदर्शतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
मंगी (बू)चा हा प्रवास आज राज्यातील अनेक आदिवासी व ग्रामीण गावांसाठी आशेचा आणि विकासाचा आदर्श ठरत आहे.
