नवापूर/प्रतिनिधी:आपल्या देशात, राज्यात तसेच आपल्या परिसरात काही ठिकाणी धर्माच्या नावाखाली सक्ती, दहशत व सामाजिक तणाव निर्माण करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या बेकायदेशीर व समाजविघातक कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठबळ देता येणार नाही. अशा घटनांना भावनिक किंवा हिंसक मार्गाने नव्हे, तर संविधान व कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्तर दिले पाहिजे, ही भूमिका ठामपणे मांडण्यात आली.
याच भूमिकेच्या अनुषंगाने समाजसेवेत कार्यरत असलेल्या सेवेकऱ्यांना कायद्याची योग्य माहिती मिळावी, त्यांना कायदेशीर संरक्षणाची जाणीव व्हावी, यासाठी “कायद्याचे संरक्षण” हे पुस्तक नाताळ भेट म्हणून प्रदान करण्यात आले. या पुस्तकामधून भारतीय संविधान, मूलभूत हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, कायदेशीर उपाययोजना तसेच नागरिकांचे अधिकार यांची सविस्तर माहिती मिळते.
धर्माच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची सक्ती, दबाव किंवा द्वेष पसरवण्याच्या प्रयत्नांना थारा देणार नाही, तसेच अशा प्रवृत्तींविरोधात कायद्याच्या मार्गानेच लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्व समाज घटकांनी शांतता, बंधुता व संविधानिक मूल्ये जपावीत, असे आवाहनही करण्यात आले.




