ग्राहकांची हक्क व कर्तव्ये यांची जाणीव प्रत्येक ग्राहकाने ठेवावी तसेच डिजिटल फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहकांनी जागृत रहावे :- तहसीलदार साहेबराव सोनवणे

 


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: साक्री तालुका ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साक्री येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे होते.यावेळी त्यांनी उपस्थितांना ग्राहकांची हक्क व कर्तव्ये याची जाणीव प्रत्येक ग्राहकाने ठेवावी तसेच डिजिटल फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहकांनी जागृत रहावे असे आवाहन केले. 

        प्रमुख पाहूणे म्हणून ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसंघटक पी.झेड् कुवर, साक्री तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरे, साक्री तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे, तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल कांगणे, साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाऊ पारख, तालुका सहसचिव दिनेश बोरसे, ग्राहक पंचायतीच्या सदस्या ए.पी.दशपुते, दिपक नांद्रे, डॉ. दिलीप चोरडिया, जोशीला पगारिया, प्रा. मनिषा पाटील, स्वस्त धान्य दुकानदार संघाध्यक्ष प्रविण खैरनार, दिलीप पवार, नरेंद्र पगारे आदि मान्यवर उपस्थित होते. 

           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हासहसंघटक पी.झेड्.कुवर यांनी केले. साक्री तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें यांनी ग्राहकांची हक्क व कर्तव्ये, तसेच डिजिटल फसवणूक या विषयी मार्गदर्शन करीत ग्राहक पंचायतीचा इतिहास, त्याची पंचसुत्री, दक्ष ग्राहक म्हणून घ्यावयाची काळजी, ग्राहक संरक्षण कायदा व त्याचे नवे स्वरूप आणि आर्थिक फसवणूकी बाबत जिल्हा, राज्य व केंद्र स्तरावर कार्यरत असलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंच व आयोग याविषयी आपल्या प्रास्ताविकेतून माहिती दिली.

      आपल्या अध्यक्षीय मनोगतात तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी साक्री तालुक्यातील उपस्थित स्वस्त धान्य दुकानदार व वितरकांना आपण नागरिकांचे सेवक आहात ही भावना मनात ठेवून वितरण व्यवस्था उत्तम अंमलात आणण्याचे आवाहन केले. 

दरम्यान 20 डिसेंबर ते डिसेंबर 25 या कालावधीतील सुशासन सप्ताह निमित्ताने तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात सहा शेतकऱ्यांना 7/12 दाखल्याचे वाटप करण्यात आले. यात गोकुळ भटू पाटील (उभंड)व एस.के.मारनर या शेतकऱ्यांचा समावेश होता.

      स्वामी विवेकानंद व ग्राहक पंचायत चे प्रणेते बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते प्रारंभीच करून सुरूवात झालेल्या या कार्यक्रमास साक्री तालुक्यातील सुमारे स्वस्त धान्य दुकानदार, शुभंकर गॅस वितरक व ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी सुनिल साळुंके यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरवठा विभागाचे भुषण पाटील, कु.निकिता चौधरी, सचिन कासार, नितीन राठोड, रवींद्र वळवी, जितेंद्र महाले यांचेसह कार्यालयातील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post