कोल्हापूर / प्रतिनिधी: शाहू महाराजांच्या प्रगत, समतावादी आणि सामाजिक न्यायाच्या परंपरेने प्रेरित कोल्हापूर नगरीत भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी–लेनिनवादी) लिबरेशनचे पहिले राज्य अधिवेशन यशस्वीपणे पार पडले. सामाजिक न्याय, समता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि परिवर्तनाच्या राजकारणाला बळकटी देण्याचा ठाम संकल्प या अधिवेशनातून व्यक्त करण्यात आला.
या अधिवेशनात भाकप–मालेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख व महाराष्ट्र प्रभारी कॉ. प्रभात कुमार, भाकप राज्य सरचिटणीस कॉ. सुभाष लांडे, भाकप–माले प्रभारी सचिव कॉ. उदय भट, प्रभारी सचिव कॉ. अतुल दिघे, भाकप–माले जिल्हा सचिव कॉ. मुक्ता मनोहर यांनी मार्गदर्शन केले. तसेच माकपचे कॉ. उदय नारकर, शेकापचे कॉ. बाबासाहेब देवकर, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले, श्रमिक मुक्तीदलचे कॉ. संपत देसाई आणि श्रमिक मुक्तीदल (लोकशाही)चे कॉ. धनाजी गुरव यांनी उपस्थितांना संबोधित केले.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील पक्ष सचिव, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यसमर्थकांमुळे अधिवेशन ऊर्जावान वातावरणात पार पडले. राज्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन आगामी काळातील लढ्यांची दिशा आणि संघटनात्मक मजबुती यावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
लोकशाहीवर होणारे हल्ले, वाढती विषमता, श्रमिक, शेतकरी, दलित, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक समाजावर होणारे अन्याय याविरोधात व्यापक लोकचळवळी उभारण्याचा निर्धार अधिवेशनात करण्यात आला. परिवर्तनवादी, प्रगत आणि जनहितकेंद्रित राजकारणासाठी भाकप (माले) लिबरेशन अधिक सक्रियपणे कार्य करेल, असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

