धुळे जिल्हा प्रतिनिधी / अकिल शहा:अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा आयुष्यभराचा छळ करणाऱ्या नराधमास निजामपूर पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातून फरार आरोपीला अटक करून पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.
निजामपूर पोलीस ठाण्यात दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी पीडित अल्पवयीन मुलीने (काल्पनिक नाव निर्भया, वय १७) दिलेल्या जबाबावरून आरोपी उत्तम सोमनाथ साबळे (वय २४, रा. मोहोळांगी, पोस्ट गोळवाड, ता. सटाणा, जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, जून २०२५ मध्ये पीडिता घरी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली होती. तिने स्त्री अर्भकास जन्म दिला; मात्र दुर्दैवाने त्या अर्भकाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२५/२०२५ अन्वये
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६४ (१) तसेच
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (POCSO) २०१२ चे कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होता. पीडितेकडे आरोपीच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही माहिती नसल्याने शोधकार्य अवघड झाले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास करत निजामपूर पोलिसांचे पथक पुणे येथे रवाना करण्यात आले. चाकण, भोसरी व निगडी परिसरात कसून शोध घेत १८ डिसेंबर २०२५ रोजी आरोपीस चाकण एमआयडीसी (ता. खेड, जि. पुणे) येथून अटक करण्यात आली.
आरोपीस १९ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) मंजूर केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि मयूर एस. भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
