धुळे जिल्हा प्रतिनिधी/अकिल शहा:अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावाने लाचेची मागणी करणाऱ्या न्यू सिटी हायस्कूलमधील उपशिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. नितीन लिलाधर ठाकुर (वय ४६, रा. देवपूर, धुळे) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार हे रावळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील रहिवासी असून त्यांनी स्वतःचे व बहिणीचे हिंदू ठाकूर या जातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे येथे अर्ज केला होता. तीन वर्षे उलटूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने चौकशी केली असता, संबंधित लिपिकाने सदर कामे शिक्षक नितीन ठाकुर यांच्यामार्फत होत असल्याचे सांगितले.
त्यानंतर ठाकुर यांची भेट घेतली असता, समितीच्या अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगून प्रती प्रमाणपत्रासाठी २.५० ते ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पंचासमक्ष पडताळणीत लाच मागणी स्पष्ट झाल्याने धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ३९६/२०२५, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व पथकाने केली.
लाच मागितली गेल्यास नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
