नवापूरमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा; सत्यशोधक शेतकरी सभेचे तहसीलदारांना निवेदन

 



नवापूर प्रतिनिधी/दिगंबर वळवी 

संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत सत्यशोधक शेतकरी सभेने आज नवापूर तहसील कार्यालयात धडक देत विविध कृषी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. तीन कृषी कायद्यांविरोधातील दिल्ली सीमेवरील शेतकरी संघर्षाला पाच वर्षे पूर्ण होत असताना केंद्र सरकारने दिलेली आश्वासने अद्याप अपूर्णच असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला.


कायदेशीर एमएसपीची मागणी केंद्रस्थानी

शेतकऱ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे हमीभाव देणारा कायदेशीर एमएसपी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच देशातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व वनहक्क शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५०,००० मदत, तसेच संयुक्त किसान मोर्चाच्या इतर सर्व मागण्यांना मान्यता देण्याची मागणीही करण्यात आली.


नवापूर तालुक्यातील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा

मका, सोयाबीन व भात पिकांना अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला असून फक्त १० ते २० टक्के उत्पादन झाले आहे. व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करत असल्याने तात्काळ सरकारी खरेदी केंद्र सुरु करून एमएसपी दरानेच खरेदी करावी; कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.


कापूस दरावरून केंद्र सरकारवर टीका

पंतप्रधानांनी १९ ऑगस्ट रोजी काढलेली अधिसूचना मागे घेऊन कापसाला C2+50% दर म्हणजेच ₹१०,०७५ प्रति क्विंटल एमएसपी जाहीर करावा आणि कापसावरील आयात कर रद्द करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनाची आठवण

नंदुरबार–मुंबई पायी बहाद्दर महामोर्चादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी त्वरित करावी, अशी आठवणही निवेदनात करून देण्यात आली.


कर्जमाफी व भरपाईची मागणी

सर्व पिक कर्ज व ठिबक कर्ज माफ करण्यासोबतच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ₹२५ लाख भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली. तसेच अतिवृष्टीग्रस्त नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली.


हे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात यावे, अशी मागणी करत कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड आर. टी. गावीत, रामदास गावीत, सेल्या गावीत, देवसिंग गावीत, उत्तम गावीत, फिलीप गावीत व रमेश गावीत यांनी निवेदन सादर केले.

Post a Comment

Previous Post Next Post