शहादा प्रतिनिधी : मुजाहिद शेख
सविस्तर वृत्त असे की,अब्दुलखालिक एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनतर्फे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शिवणकला प्रशिक्षण व रोजगारनिर्मिती कार्यक्रमाचे भव्य आयोजन शहादा येथे करण्यात आले. स्थानिक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आवश्यक साहित्य, मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून देण्यात आले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सशक्तीकरण अत्यावश्यक असल्याचा पुनरुच्चार करत फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री. खलीक जसीम शेख यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून महिलांचे मनोबल वाढविले.
कार्यक्रमादरम्यान महिलांना शिवणयंत्रे व प्रशिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. विविध वयोगटातील महिलांनी भरभरून सहभाग नोंदवत शिवणकला हे स्वावलंबनाचे प्रभावी साधन असल्याचे मत व्यक्त केले. अनेक महिलांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून छोटा उद्योग सुरू करून घरच्या उत्पन्नात वाढ करण्याची इच्छा व्यक्त केली.
श्री. खलीक जसीम शेख म्हणाले—
“महिला सक्षम झाली की कुटुंब सक्षम होते, आणि कुटुंब सक्षम झाले की समाज प्रगत होतो. आमचा उद्देश केवळ प्रशिक्षण देणे नाही, तर महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करणे आहे.”
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे सक्रिय सदस्य सकीब शाह, आज़म तेली, अल्तमाश बगवान, नोमान मंसुरी, आज़म मिर्ज़ा, अफ्फान बगवान, गुफरान अंसारी, फ़ैज़ान शाह, रिज़वान अंसारी तसेच अन्य स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी फाउंडेशनतर्फे ठाम संदेश देण्यात आला—
“महिलांचे सबलीकरण हा समाजाच्या प्रगतीचा मुख्य मार्ग आहे. प्रत्येक महिलेला संधी दिल्यास ती संपूर्ण पिढीचे भविष्य बदलू शकते.”
