“विहिरी खोदूनही अनुदान नाही! — नवापूरच्या शेतकऱ्यांचा संताप, सत्यशोधक शेतकरी सभेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन”



नंदुरबार / प्रतिनिधी:नवापूर तालुक्यातील आदिवासी वनहक्क दावेदार आणि शेतकऱ्यांना “बिरसा मुंडा क्रांती योजना” अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींचे अनुदान अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक शेतकरी सभेच्या जिल्हाध्यक्ष कॉ. आर. टी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन सादर केले.


निवेदनात म्हटले आहे की, संबंधित शेतकऱ्यांनी सहा ते सात महिन्यांपूर्वीच विहिरींचे बांधकाम पूर्ण केले असून, शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक अहवाल व कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र, आजतागायत अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर मजुरी, ट्रॅक्टर आणि पोकलेनच्या भाड्याचा आर्थिक बोजा वाढला आहे.


अनेक लाभार्थी विधवा महिला असून, त्यांना योजनेतील लाभ न मिळाल्याने जगण्याची लढाई कठीण झाली आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. “शासन योजना शेतकऱ्यांसाठी आहेत की कागदावर दाखविण्यासाठी?” असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.


या निवेदनात एकूण २० लाभार्थी शेतकऱ्यांची नावे नमूद करण्यात आली असून, त्यांचे अनुदान तत्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सत्यशोधक शेतकरी सभेने संबंधित विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करून, शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post