नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी/संदिप कोकणी:भारतीय जनता पार्टीचा तांत्रिकदृष्ट्या राजीनामा दिलेला असला तरी मागील वर्षभर मी भाजपासाठीच कार्यरत होते. तांत्रिक पूर्ततेनंतर आज पुनश्च भाजपात प्रवेश देण्यात आला असून पक्षाकडून निलंबन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती महा संसदरत्न मा. खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या, “भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यात शक्ती वाढावी यासाठी नव्या जोमाने मी कार्यरत होणार आहे.”
नंदुरबार येथील आपल्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित उपस्थित होत्या.
डॉ. गावित म्हणाल्या की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीकडून उमेदवार आणि युती संदर्भातील निर्णय घेतले जातील. मात्र, नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवल्या जाणार आहेत, हे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “भाजपात मला पुन्हा प्रवेश देऊन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माझ्या कार्यावर विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार असून पक्षाची ध्येयधोरणे राबविण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.”
डॉ. गावित यांनी विरोधकांवरही टोल घेत म्हणाल्या की, “भाजपात मला स्थान उरलेले नाही, असे दर्शविणाऱ्यांना पक्षश्रेष्ठींनीच उत्तर दिले आहे. कारण, राजीनामा दिल्यानंतरही मी सदस्य नोंदणी अभियानात सक्रीय होते आणि हजारो कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडले.”
त्या म्हणाल्या, “२०१४ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते मी भाजपात प्रवेश केला. मागील ११ वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने जिल्ह्यात ऐतिहासिक विकासकामे झाली. मेडिकल कॉलेज, दुहेरी रेल्वेमार्ग, महामार्ग व दुर्गम रस्त्यांचा विकास — हे सर्व लोकांच्या आशीर्वादाने आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाने शक्य झाले.”
शेवटी त्यांनी सांगितले, “स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा ध्वज फडकावा, हेच माझे ध्येय आहे. शहर, ग्रामीण आणि दुर्गम भागात जनसंपर्क वाढवण्यासाठी ‘जनसंवाद अभियान’ सुरू केले असून कार्यकर्त्यांच्या बळावर जिल्ह्यात भाजपाची शक्ती नव्या जोमाने उभी राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे.”
