नवापूर प्रतिनिधी/दिगंबर वळवी:सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष व सत्यशोधक शेतकरी सभा, ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नवापूर तालुक्यातील निवडणुकीत यंदा ५ गट आणि १० गणात उमेदवार उतरविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हा निर्णय सत्यशोधक शेतकरी सभा व ग्रामीण कष्टकरी सभेच्या केंद्रीय कार्यालय विसरवाडी येथे झालेल्या तालुका कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.बैठकीत जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आर. टी. गावीत यांनी सांगितले की, “नंदुरबार जिल्ह्यातील जल, जंगल आणि जमीन या प्रश्नांबरोबरच शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, पिकांना हमीभाव, तसेच रेशन, रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाच्या मूलभूत प्रश्नांवर सत्यशोधकच रस्त्यावर उतरून लढा देत आहे.”त्यांनी पुढे म्हटले की, “अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सत्ताधारी आणि विरोधक गप्प बसले असताना सत्यशोधकांनीच सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडले. मात्र स्थानिक प्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे दुसऱ्याच दिवशी नंदुरबार जिल्हा यादीतून वगळण्यात आला. तरीही सत्यशोधक ठाम राहून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आणि कापूस, सोयाबीनसह इतर पिकांची पाहणी करण्यास प्रशासनाला भाग पाडले.”तसेच MIDC क्षेत्रात आदिवासींच्या जमिनी जबरदस्तीने काबीज करण्याचा विरोध सत्यशोधक पक्षाने तीव्र शब्दांत केला. जमिनी भांडवलदारांना भाडेपट्ट्याने देणाऱ्या धोरणाविरोधात सत्यशोधक पक्ष आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे, असेही त्यांनी सांगितले.नवापूर तालुक्यातील अनेक रस्ते कागदावर तयार असून प्रत्यक्षात त्यांची दयनीय अवस्था आहे, याबाबत सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.यावेळी कॉम्रेड आर. टी. गावीत यांनी सांगितले की, “आदिवासी आरक्षणात बोगस घटकांचा समावेश होऊ नये, धनगर, बंजारा आणि इतर कोणत्याही जातीचा समावेश आदिवासी आरक्षणात होऊ नये, या मागणीसाठी हजारो लोकांचा मोर्चा काढून विरोध करणारा पक्ष म्हणजे सत्यशोधक पक्ष आहे.”
निवडणूक तयारी:
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष नवापूर तालुक्यातील खालील ५ गट व १० गणात उमेदवार उतरवणार आहे.
५ गट: नागझरी, हळदाणी, मोगराणी, खांडबारा, श्रावणी
१० गण: नागझरी, करंजी बु., हळदाणी, खानापूर, मोगराणी, ढोंग, करंजाळी, खांडबारा, शेही, श्रावणी
उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आर. टी. गावीत यांनी दिली.बैठकीला कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड रामसिंग गावीत, कॉम्रेड रणजित गावीत, दिलीप गावीत, सेल्या गावीत, रामदास गावीत, शीतल गावीत, गेवाबाई गावीत, बंधारीबाई गावीत, जालमसिंग गावीत, दिवाणजी नाईक, बलामा गावीत, उत्तम गावीत, सुनील गावीत, गोबजी गावीत, जगन गावीत, तसेच तालुका कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सत्यशोधक पक्षाने घेतलेल्या या निर्धारामुळे नवापूर तालुक्यातील निवडणूक रंगणार असून, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे.
