
नवापूर /प्रतिनिधी : नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून सोयाबीन, कपाशी, मका, उडीद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून पंचनाम्याच्या कामास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे आज तहसीलदार तसेच कृषी अधिकारी, नवापूर यांना निवेदन सादर करण्यात आले.
दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले, मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष पंचनाम्याचे काम सुरू झालेले नाही.
या विलंबामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली असून, पाच दिवसांच्या आत पंचनाम्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सभेचे नेते कॉ. आर. टी. गावीत यांनी दिला आहे.
तसेच गावागावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील नुकसानीची यादी तयार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. करंजी बु. गावातील शेतकऱ्यांनी दाखवलेल्या पुढाकाराप्रमाणे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या नुकसानीचा तपशील एकत्रित करून प्रशासनास सादर करावा, जेणेकरून सरकारसमोर खरी परिस्थिती स्पष्ट होईल आणि नुकसान भरपाईसाठी तात्काळ पावले उचलली जातील.तातडीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेचा आवाज पंचनामा न झाल्यास सत्यशोधक शेतकरी सभेचा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे