खतांची दुप्पट किंमतीने विक्री; बिरसा फायटर्सची कारवाईची मागणी;तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन..


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:
शहादा तालुक्यात दुप्पट किंमतीने खतांची विक्री करून शेतक-यांची लूटमार करणा-या व बोगस खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा व तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,सुरेश पवार, जगदीश डुडवे,दिनेश पवार,पप्पू अवाया आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

                        जिल्ह्य़ात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणा-या शेतक-यांची संख्या विक्रेत्यांकडे वाढली आहे.या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही खत दुकानदार युरिया सह सर्वच खत दुप्पट किंमतीने विकून शेतक-यांची लूटमार करीत आहेत. तसेच बोगस खतांची विक्री करत आहेत. डिएपी खताची किंमत १३०० रूपये असतांना १८०० रूपयांत विक्री केली जात आहे.दाणेदार खताची किंमत ५०० रूपये असतांना ६०० रूपयांत, फाॅस्फेटची किंमत ४५० रूपये असतांना ६५० रूपयांत, युरीयाची किंमत २७०रूपये असतांना ४५० रूपयांत विक्री करून लुटमार केली जात आहे. शहादा तालुक्यातील खते मध्यप्रदेश राज्यात अनाधिकृत पणे विक्रीस नेला जात आहे.म्हणून शहादा तालुक्यात कृषी सेवा केंद्र व खत विक्रेता सर्वच दुकानात किती माल ( खत )आला ? किती माल विक्री झाला? कुठे विक्री झाला? याची सखोल चौकशी करण्यात यावी.

                  बोगस खतांमुळे पिकांची वाढ होत नाही व उत्पन्नात घट होते.शेतक-यांना आर्थिक नुकसान होते.त्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. म्हणून शहादा तालुक्यातील सर्वच खतांची तपासणी करूनच विक्रीस परवानगी देण्यात यावी.बोगस खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post