हर हर महादेव... जय भोले ....ओम नमः शिवाय चा गजरात विधिवत रुद्राभिषेक पूजा करून एक लाख रुद्राक्ष व वृक्षांचा रोपट्यांचे हजारो नागरिकांना वाटप ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे: हर हर महादेव... जय भोले ....ओम नमः शिवाय चा गजरात विधिवत रुद्राभिषेक पूजा करून एक लाख रुद्राक्ष व वृक्षांचा रोपट्यांचे हजारो नागरिकांना वाटप करण्यात आले. अध्यात्म, विज्ञान व पर्यावरणाची सांगड घालून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कुंजबिहारी प्रतिष्ठान ट्रस्ट व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत दादा पाटील मित्र मंडळातर्फे अभिमंत्रित एक लाख रुद्राक्ष व रोपट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सकाळी बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील व प्रीती पाटील यांनी सपत्नीक रुद्राभिषेक पूजा केली यावेळी द्वारकेश खगेन्द्र बुवा, केशव पाठक, माधव पाठक, विजय पाठक, प्रशांत शुक्ल व सहकाऱ्यांनी मंत्रोच्चाराचे पठण केले.

यावेळी भागवताचार्य खगेन्द्र महाराज यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आज कामिका एकादशी असल्याने या दिवशी शिवपुराण व विष्णुपुराण ऐकण्याचे पुण्य उपस्थितांना मिळाले. प्रेम आणि भक्ती समन्वयातून निर्माण होते. गृहस्थी माणसाने पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्याला महत्त्व आहे. प्रारब्ध शिवाय भाग्य नसते. प्रारब्धात जे लिहिले आहे ते अटळ असते. याचबरोबर त्यांनी रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ असले तरी शिवरूप असून रुद्राक्ष महिमा उपस्थितितांना सांगितली. सध्या परिसरात वृक्षराजी कमी झाल्याने अवेळी पाऊस पडत आहे त्याचबरोबर पर्यावरणातही मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी वृक्ष लावणे गरजेचे आहे. अध्यात्म आणि पर्यावरणाची सांगड घालून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात निश्चितच संस्कृती सोबत पर्यावरणाचे रक्षण उपस्थितांकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या धार्मिक कार्यक्रमाला तहसीलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल,शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, उपसभापती भानुदास पाटील, संचालक मंडळ, लक्ष्मण कदम, डॉ. कांतीलाल टाटिया,माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, डॉ. सुरेश नाईक,सातपुडा शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव, वर्षा जाधव, जितेंद्र जमदाडे, लोटन धोबी, यांसह विविध राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह महिला व पुरुष भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी महाआरती होऊन उपस्थित हजारो भाविक भक्तांना रुद्राक्ष सोबत वृक्षांचे रोपटे वाटप करण्यात आले. भाविक भक्तांना प्रसाद अनिल सुभाष पाटील (सुलवाडे), पिनाकिन पटेल (शहादा) यांच्याकडून केळीचे तर उपवासाची फराळ वाटप संदीप पाटील (कलमाडी) यांच्याकडून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजीत दादा मित्रपरिवार व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post