नंदुरबारचे खासदार ॲड.गोवाल के.पाडवी यांचा समस्त आदिवासी समाज वासियांना जाहीर आश्वासन..!

 


माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवांना, माता-भगिनींना आणि युवा शक्तीला माझा सस्नेह जय जोहार🙏 


आदिवासी संघटनेतील तरुण जय वळवीच्या अमानुष हत्येने आपणा सर्वांच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना. या क्रूर कृत्याचा मी आधीच जाहीर निषेध करीत त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले आहेच त्यासोबत यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ठामपणे लढत आहे.


२४ तारखेला जय वळवीला न्याय मिळवून देण्यासाठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आला आणि शांततेत मूक मोर्चा काढला. मात्र काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालून आपल्या शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. ही कृती दुर्दैवी असून त्यांचा आपल्या खऱ्या उद्देशाशी काहीही संबंध नाही.


या घटनेनंतर काही निरपराध तरुणांना पोलिसांनी अटक केली. कोणताही निरपराध तरुण भरडला जाऊ नये यासाठी मी आणि माजी मंत्री अँड के सी पाडवी साहेबानी तातडीने पाऊले आधीच उचलली आहेत, गृह खात्याला निवेदन दिले असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेतच आज पुन्हा नंदुरबार पोलिस अधीक्षक यांच्याशी भेटून अटक झालेल्या निर्दोष तरुणांची सुटका व्हावी या संबंधित भेट घेत सर्व माहिती घेतली आहे.

याशिवाय, अटक झालेल्या तरुणांच्या सुटकेसाठी कायदेशीर लढा सुरू केला आहे. वरिष्ठ वकील तसेच समाजातील वकिलांमार्फत माझी टीम यावर काम करत आहे. लवकरच आपल्या बांधवांची सुटका होईल असा विश्वास देतो.


बंधू-भगिनींनो,

या काळात काही लोक या दुर्दैवी घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं स्पष्ट आवाहन आहे – कुठल्याही राजकारणाचा बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावर समाजाला हानी होईल अशा गोष्टी टाकू नका.


आजची वेळ आहे एकजुटीने, शांततेने आणि कायद्याच्या मार्गाने उभे राहण्याची. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय आणि संविधानाच्या शक्तीवर आपला विश्वास ठेवा.


जय वळवीला न्याय मिळवण्यासाठी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण सारे एकत्र आहोत.

मी आणि के सी पाडवी साहेब माझ्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.


जय जोहार! जय संविधान! धन्यवाद.

Post a Comment

Previous Post Next Post