धुळे प्रतिनिधी/ प्रकाश नाईक :मानवजातीचा इतिहास पाहिला तर संवाद हीच प्रगतीची खरी किल्ली ठरली आहे. विचार, संस्कृती, तत्त्वज्ञान, विज्ञान किंवा साहित्य – हे सर्व ज्ञान जगभर पोहोचवण्यासाठी भाषेचा पूल उभारणारे अनुवादक हे खरे पूलनिर्माते आहेत. ३० सप्टेंबर रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन हा त्यांच्या कार्याचा गौरव करणारा दिवस आहे.
भाषा बदलली की विचार मांडण्याची शैलीही बदलते. परंतु ज्ञान हे सार्वत्रिक आहे. एका भाषेत निर्माण झालेल्या विचारांचा इतर भाषांपर्यंत प्रवास करून देणारे अनुवादक हे ज्ञानाचे वाहक ठरतात.
विज्ञान व तंत्रज्ञानातील नवनवीन माहिती जागतिक पातळीवर पोहोचवणे
साहित्य, कविता, कादंबऱ्या, धार्मिक ग्रंथ सर्वत्र उपलब्ध करणे
व्यापार, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करणे
हे सर्व अनुवादाशिवाय शक्य नाही.
जागतिकीकरण आणि अनुवाद :
आजचे जग हे माहिती-तंत्रज्ञानावर आधारित आहे. इंग्रजी, फ्रेंच, अरबी, हिंदी, मराठी अशा असंख्य भाषांमध्ये संवाद सुरू आहे. इंटरनेटमुळे जग एकत्र आले आहे, पण त्या जोडणीसाठी अनुवादाचीच आवश्यकता आहे. Google Translate, AI Tools यामुळे भाषांतर सुलभ झाले असले तरी मानवी अनुवादातील भाव, संस्कृती आणि संदर्भ यांचे स्थान अजूनही अद्वितीय आहे.
भारतातील संदर्भ :
भारत हा विविध भाषांचा खरा खजिना आहे. प्रत्येक राज्याची भाषा, बोली, लिपी, साहित्य आणि संस्कृती अनुवादामुळेच एकमेकांपर्यंत पोहोचतात. संविधान, शैक्षणिक साहित्य, सरकारी योजना, न्यायालयीन कागदपत्रे यामध्ये अनुवादाची भूमिका महत्त्वाची आहे. "एकतेत विविधता" या तत्त्वाला अनुवाद हेच खरे बळ आहे.
आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन आपल्याला हे स्मरण करून देतो की अनुवाद हे केवळ भाषांतर नसून ते संस्कृतींचा संवाद आहे. भूतकाळातील वारसा, वर्तमानातील ज्ञान आणि भविष्याच्या संधी यांना जोडणारी ही सुवर्णसाखळी आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबर इतर भाषांचा सन्मान करावा आणि अनुवादाच्या माध्यमातून जगाशी जोडले जावे.
नाव :- पल्लवी उत्तम गांगुर्डे .
वर्ग :- FY.BSW
महाविद्यालयाचे नाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (नकाने) धुळे
