धुळे प्रतिनिधी/प्रकाश नाईक :मन:शांती, समाधान आणि आनंद या सर्वांचा उगम 'धन्यवाद' या छोट्याशा शब्दात दडलाय." प्रत्येक वर्षी २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक कृतज्ञता दिवस साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे फक्त एक परंपरा किंवा औपचारिकता नसून मानवजातीला स्मरण करून देणारा दिवस आहे की जीवनात आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानणे किती महत्त्वाचे आहे. आधुनिक काळात जिथे स्पर्धा, स्वार्थ, आणि अहंकार वाढताना दिसतो तिथे कृतज्ञतेची भावना समाजात आपुलकी, एकमेकांप्रती आदर आणि सौहार्द निर्माण करण्याचे कार्य करते.
कृतज्ञता ही केवळ शब्दात नाही तर मनाच्या खोलवर रुजलेली भावना आहे. बाल्यापासूनच आपल्याला मिळालेली आईची माया, वडिलांचा त्याग, गुरुंचे ज्ञान, मित्रांचे पाठबळ, शेजाऱ्यांची साथ, समाजाचा आधार, निसर्गाचे वरदान—या सर्वांसाठी कृतज्ञ राहणे ही खरी मानवी संस्कृती आहे. आज आपण ज्या सुखसोयींनी, सुरक्षिततेने आणि प्रगतीने जगतोय त्या सर्वांमागे असंख्य लोकांचे आणि घटकांचे योगदान आहे. या दिवसाचे महत्त्व हेच आहे की आपण थांबून त्या प्रत्येक योगदानाची आठवण करून मन:पूर्वक “धन्यवाद” व्यक्त करावा.
मानसशास्त्राच्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की कृतज्ञतेमुळे व्यक्तीचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते. आभार मानणाऱ्या लोकांमध्ये तणाव कमी होतो, नैराश्य दूर राहते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची वृत्ती बळकट होते. कृतज्ञता म्हणजे समाधानाचा दरवाजा, आणि समाधानातूनच आनंदाचा मार्ग खुला होतो.
भारतीय संस्कृतीतही कृतज्ञतेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. "मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथी देवो भव" हा संस्कार आपल्याला शिकवतो की आई-वडील, शिक्षक आणि प्रत्येक अतिथी देवासमान आहेत. वेद-उपनिषदांपासून ते संतांच्या वाङ्मयापर्यंत सर्वत्र कृतज्ञतेचे महत्त्व अधोरेखित केलेले दिसते. निसर्गासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा सण-उत्सवातून दिसते. मकर संक्रांत, वसंत पंचमी, पावसाळ्यातील वृक्षपूजन, दीपावलीतील गोधनपूजन या सर्व सणांमागे निसर्गाचे आणि साधनांचे आभार मानण्याचीच प्रेरणा आहे.
आजच्या यांत्रिक जीवनात लोकांकडे वेळ आहे धावपळीचा, पण मनात जागा नाही "धन्यवाद" म्हणण्याची. लहानशा गोष्टीसाठी, जसे की एखाद्याने आपल्याला दार उघडून दिले, मदतीचा हात दिला, हसून उत्तर दिले—या छोट्या कृतींसाठी आभार मानले तरी ते नातेसंबंध अधिक दृढ करतात. त्यामुळे जागतिक कृतज्ञता दिवस आपल्याला शिकवतो की कृतज्ञता ही फक्त मोठ्या प्रसंगापुरती नसून ती दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असायला हवी.
हा दिवस समाजाला, कुटुंबाला, मित्रपरिवाराला आणि आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक घटकाला स्मरण करण्याचा दिवस आहे. एक विद्यार्थी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो, रुग्ण डॉक्टर व परिचारिकांच्या सेवेसाठी आभार मानू शकतो, नागरिक शेतकऱ्यांच्या श्रमांप्रती नम्रता दाखवू शकतो, आणि आपण सर्वजण निसर्गाच्या प्रत्येक देणगीसाठी कृतज्ञ राहू शकतो. या आभार व्यक्त करण्याच्या संस्कृतीतून आपला समाज अधिक संवेदनशील, मानवतावादी आणि शांततामय होऊ शकतो.
नाव :- शाबान शब्बीर पटेल
वर्ग :- FY.BSW
महाविद्यालयाचे नाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (नकाने) धुळे
.jpg)