प्रदोष व्रत : महत्व आणि विधीशा;बान शब्बीर पटेल.


धुळे प्रतिनिधी /प्रकाश नाईक:

 

           “शिवरायांच्या चरणी जेव्हा ठेवतो विश्वास,

  दुःख-संकटे सारे होतात क्षणात नाश.

                 प्रदोषी जेव्हा करतो शिवाचे ध्यान,

जीवन होते मंगल, दूर होतो त्रास.”

                                                              

हिंदू संस्कृतीत प्रत्येक व्रत आणि उपवासाला एक विशेष स्थान आहे. भक्ती, श्रद्धा आणि साधनेचा संगम घडवून आणणारी ही परंपरा आजही समाजात प्रचलित आहे. त्यातच त्रयोदशीला येणारा प्रदोष व्रत शिवशंकराला अर्पण केलेला अत्यंत मंगल व्रत मानला जातो. “प्रदोष” म्हणजे दिवस आणि रात्रीचा संगमाचा क्षण. या वेळेस शिवशंकर आपली उपासना करणाऱ्या भक्तांवर प्रसन्न होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

या व्रताचे महत्त्व अतिशय व्यापक आहे. प्रदोष व्रत केल्याने पापांचा नाश होतो, जीवनातील अडचणी दूर होतात आणि दीर्घायुष्य, आरोग्य व समृद्धीची प्राप्ती होते. कुटुंबातील तणाव आणि वैवाहिक जीवनातील मतभेद दूर करून सुख-शांती नांदते, असा अनुभव भक्तांना आला आहे. ज्यांच्या जीवनात दुःख, अडथळे किंवा रोगांचे संकट आहे त्यांनी हे व्रत श्रद्धेने केल्यास शिवकृपा लाभते, अशी लोकमान्यता आहे.

व्रताची पद्धतदेखील साधी आणि शिस्तबद्ध आहे. सकाळी स्नान करून उपवासाचा संकल्प केला जातो. दिवसभर भक्त फलाहार किंवा केवळ जलाहार करतात. संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून मंदिरात जाऊन किंवा घरीच शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली जाते. बेलपत्र, दूध, जल, धतूरा, फुले अर्पण करून शिवशंकराचे आवाहन केले जाते. या वेळी शिवमहिम्न स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा “ॐ नमः शिवाय” जपाचे विशेष महत्त्व असते. शेवटी आरती करून प्रसाद वाटला जातो आणि व्रत समाप्त होते.

प्रदोष व्रत जर सोमवार, मंगळवार किंवा शनिवार यांपैकी कोणत्याही दिवशी आले तर त्याचे विशेष पुण्य मानले जाते. सोमप्रदोषाने मानसिक शांती मिळते, मंगळप्रदोषाने कर्ज, शत्रू किंवा अडथळ्यांपासून सुटका होते, तर शनि प्रदोष व्रत केल्याने शनीच्या पीडा कमी होतात असे शास्त्र सांगते.

या व्रतामध्ये भक्ती, संयम आणि आत्मशुद्धी यांचा अद्भुत संगम आढळतो. उपवासामुळे शरीर शुद्ध होते, मंत्रजप आणि ध्यानामुळे मन शांत होते आणि शिवपूजनामुळे आत्म्याला सकारात्मकतेचा अनुभव मिळतो. म्हणूनच प्रदोष व्रत हे केवळ धार्मिक कर्तव्य न मानता ते जीवनातील संतुलन, श्रद्धा आणि आंतरिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे असे म्हणावे लागेल.

नाव :- शाबान शब्बीर पटेल.

वर्ग :- FY.BSW

महाविद्यालयाचे नाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (नकाने) धुळे

Post a Comment

Previous Post Next Post