राष्ट्रीय बेटी दिवस आणि एन.एस.एस. डे ;शाबान शब्बीर पटेल


 धुळे प्रतिनिधी / प्रकाश नाईक 

 “बेटी ही घरातील मायेची सावली आहे, आणि सेवा ही तरुणाईच्या जीवनाची खरी ओळख आहे.” 

भारतीय संस्कृतीत मुलगी ही देवीचे रूप मानली जाते. घरात मुलगी जन्माला आली की ते घर उजळून निघते, वातावरणात आनंदाची चाहूल लागते. पण या आनंदामागे समाजाची कटू वास्तविकता लपलेली आहे. अनेक वर्षांपासून मुलींकडे दुय्यम नजरेने पाहिले गेले. मुलगा म्हणजे वारस, आणि मुलगी म्हणजे परकी – अशी चुकीची मानसिकता समाजात रुजली. यामुळे मुलींच्या जन्माला मर्यादा आल्या, भ्रूणहत्या वाढल्या, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले.

हीच परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रीय बेटी दिवस साजरा केला जातो. हा दिवस केवळ सण किंवा औपचारिकता नाही, तर मुलींच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आणि त्यांच्या हक्कांचा सन्मान करणारा दिवस आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स सारख्या महिला अंतराळवीर, मेरी कोम आणि पी.व्ही. सिंधू सारख्या खेळाडू, इंदिरा गांधीसारख्या नेत्या, लता मंगेशकर सारख्या गायिका – सगळ्या महिलांनी आपल्या कार्याने भारताचा अभिमान वाढवला आहे. हे दाखवते की संधी मिळाल्यास मुलगी आकाशालाही गवसणी घालू शकते.

राष्ट्रीय बेटी दिवस आपल्याला हे शिकवतो की मुलगी ही कधीच ओझे नाही. ती घराचा मान आहे, आई-वडिलांचा आधार आहे, समाजाचा कणा आहे. मुलगी शिकली तर घर उजळते, पिढ्या घडतात, संस्कार रुजतात. म्हणूनच "बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ" हा मंत्र आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे.

याच दिवशी आणखी एक महत्त्वाचा दिवस साजरा होतो – तो म्हणजे एन.एस.एस. डे. २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षात राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाली. या योजनेचा उद्देश होता तरुणाईला समाजाशी जोडणे, त्यांना सेवाभाव शिकवणे. “Not Me But You” म्हणजेच “मी नाही, आपण” हे NSS चे ब्रीदवाक्य आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानात अडकून राहू नये, तर प्रत्यक्ष समाजात उतरून लोकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यावर उपाय शोधावेत – हीच NSS ची खरी शिकवण आहे. NSS स्वयंसेवक गावोगावी जाऊन स्वच्छता मोहीम राबवतात, रक्तदान शिबिरे घेतात, वृक्षारोपण करतात, ग्रामविकासात हातभार लावतात, निरक्षरांना शिक्षण देतात, पर्यावरण संवर्धनासाठी काम करतात. नैसर्गिक आपत्ती आली की हे स्वयंसेवक धावून जातात.

या कामांतून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघटन, नेतृत्व, जबाबदारी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकी जागृत होते. NSS केवळ उपक्रमांची मालिका नाही, तर जीवनाला घडवणारा अनुभव आहे.

राष्ट्रीय बेटी दिवस आणि NSS दिन यांचा एकत्रित संदेश खूप मोठा आहे. मुलगी ही समाजाची अर्धांगिनी आहे, तिच्या सन्मानाशिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. आणि तरुणाई ही समाजाची उर्जा आहे, जी सेवाभावाने झळकली तर राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर झेपावते.

नाव :- शाबान शब्बीर पटेल

वर्ग :- FY.BSW

महाविद्यालयाचे नाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (नकाने) धुळे

Post a Comment

Previous Post Next Post