मोराणे प्रतिनिधी/प्रकाश नाईक:समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य, मा. डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या संकल्पनेतून समाजकार्य महाविद्यालयात प्राचार्य - विद्यार्थी संवाद उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. विष्णू गुंजाळ आणि बी.एस.डब्ल्यू.भाग I, II व III तसेच एम.एस.डब्ल्यू. भाग I व II या प्रत्येक वर्गातून चार विद्यार्थी (दोन विद्यार्थी व दोन विद्यार्थिनी) असे एकूण २० विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर उपक्रमामध्ये महाविद्यालयाच्या मा. प्राचार्यांद्वारे सहभागी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला.
सर्वप्रथम प्राचार्य मा. डॉ. विष्णू गुंजाळ सरांनी विद्यार्थ्यांची वैयक्तिक ओळख करून घेतली. त्यानंतर महाविद्यालयीन वातावरण, शैक्षणिक बाबी व विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी यावर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाच्या व वैयक्तिक स्तरावरील समस्या मांडल्या. विशेषतः वर्गतासिकांमध्ये येणाऱ्या समस्या, वर्गांमध्ये येणाऱ्या अडचणी तसेच इतर महाविद्यालयीन अडचणी याबाबत विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. प्राचार्य, डॉ. विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध अडचणी, त्यांना येणाऱ्या समस्यांसंदर्भात सर्व माहिती जाणून घेतली व योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत आश्वासन दिले.
या संवादामुळे प्राचार्य व विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक मजबूत होण्यास सहकार्य मिळाले असून विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी निवारणासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरू शकेल. अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. सदर कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी घेण्यात येणार आहे.
प्राचार्य, विद्यार्थी संवाद उपक्रमाचे समन्वयक प्रा. मेघावी मेश्राम यांनी सदर उपक्रमाचे आयोजन आणि नियोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.
