जग लोकांच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावे.


SKpublicvoice News
संपादकीय,

   ईर्षा.... म्हणजे काय?

एकदा ब्रह्मवदेव रथातून जात असताना सारथी अचानक रथ थांबवतो. ब्रह्मदेवाने कारण विचारले असता, तो सांगतो की एक छोटा प्राणी बसला आहे. तो रस्त्यातून बाजूला होत नाही म्हणून रथ थांबवावा लागला. त्याला बाजूला होण्याची विनंती कर. थोड्या वेळाने ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्या वर सारथ्याने सांगितले की, तो प्राणी पूर्वी होता त्यापेक्षा मोठा झाला आहे.

ब्रह्मदेवाने सांगितले की, त्याला चाबूक दाखव म्हणजे तो बाजूला जाईल. ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर कळले की, तो प्राणी अधिकच मोठा झाला आहे. आता तो प्राणी तर एका डोंगरा एवढा मोठा झाला आहे. आणि रथावर चाल करून येत आहे. हे ऐकताच ब्रह्मदेव म्हणाले, रथ मागे घे आणि त्याला सांग की, ’तूच श्रेष्ठ आहेस, आम्ही रथ वळवतो आणि दुसर्‍या मार्गाने जातो. ’

सारथ्याने हे सांगितल्यावर तो प्राणी एकदम मुंगी इतका छोटा झाला आणि रस्त्यातून बाजूला झाला. आश्चर्यचकित झालेल्या सारथ्याने ब्रह्मदेवास याचे कारण विचारता देवाने सांगितले की, त्या प्राण्याचे नाव ईर्षा असे होते. आपण जेवढे महत्त्व त्याला देऊ तेवढा तो मोठा होत जाईल. मात्र आपण स्पर्धेतून दूर झाल्यावर ईर्षा राहिली नाही आणि तो सामान्य स्वरूपात आला.

सर्वच स्पर्धा जिंकण्यासाठी खेळायच्या नसतात. काही वेळा फालतू स्पर्धेत भाग घेतल्यामुळे उगाच ऊर्जा व्यर्थ खर्च होते. काही वेळा नमते घेतल्या मुळे फायदाच होतो. याचप्रमाणे जग लोकांच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावे. आपण सुखी आहोत, याची पावती लोकांकडून घेण्यापेक्षा आपले सुख आपणच अनुभवावे.

आपला निर्णय आपण घ्यावा आणि त्यास जबाबदार राहावे. लोक काय म्हणतील, याचा फार विचार करू नये. कारण एक दिवस प्रमाणा पेक्षा कोणीही आपल्याला जवळ करणार नाही, तेव्हा आपले सुख-दुःख आपणच अनुभवावे, आयुष्य तणावमुक्त होते.

Post a Comment

Previous Post Next Post