
नवापूर! Navapur/ SKpublicvoice
प्रतिनिधी / विकास वसावे
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान शनिवारी झाले यात ५२.८२ टक्के मतदान झाले. रविवारी सार्वजनिक गुजराती हायस्कुल मध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी साडेआठ वाजेला मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
नवापूर शहरात ६, नवागाव ६, विसरवाडी ६, खांडबारा ४, नंदुरबार २ असे एकूण २४ केंद्रांवर मतदान झाले. नवापूर शहरातील वनिता विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी मतदार यादीतील क्रमांक व एक गट सोडून दुसऱ्या गटात नाव गेल्याने काहिसा गोंधळ निर्माण झाला होता. उमेदवार व अधिकाऱ्यांमध्ये बातचीत झाल्यानंतर संभ्रमता काही अंशी दूर करण्यात आला.
नवागाव मतदार केंद्रावर माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक व आमदार शिरीषकुमार नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, विनोद नाईक यांनी मतदान केले.तर नवापूर मतदान केंद्रावर भाजपचे तालुकाध्यक्ष भरत माणिकराव गावित व जिल्हा परिषद सदस्य संगीता भरत गावित यांनी मतदान केले. विसरवाडी मतदान केंद्रावर सकाळपासूनच वयोवृद्ध मतदारांनी मतदान केंद्र कक्षा समोर रांगा लावल्या होत्या. कारखाना स्थापनेपासून पाच वेळा निवडणूक बिनविरोध झाली. मात्र आता शनिवारी सहव्या पंचवार्षिकसाठी निवडणूक होऊन मतदान घेण्यात आले.
पाच गटांत झालेले मतदान
नवागाव २३२५ पैकी ११४१, नवापूर २२५५ पैकी १२४९, विसरवाडी २६७८ पैकी १५४१, खांडबारा १७१४ पैकी ७९२, नंदुरबार ७४७ पैकी ४११ असे एकूण ९७१९ पैकी ५२३४ मतदारांनी हक्क बजावला.