
नंदुरबार! Nandurbar/SKpublicvoice
प्रतिनिधी /अमिनोद्दीन शेख
शहराच्या तापमानात घट आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारपासून थंडी वाढल्याने उब घेण्यासाठी शेकोटया पेटवल्या जात आहेत. तर सकाळी फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिममध्ये जावून शरीर निरोगी राहण्यासाठी आता युवकांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सारेच व्यायाम करतांना दिसत आहेत. शनिवारी कोळदा विज्ञान केंद्रात नंदुरबारचे किमान तापमान ११.८ अंश सेल्सीअस एवढे मोजण्यात आले. आठवडेभरात तापमान पन्नास टक्क्यांनी खाली आल्याचे पाहायला मिळाले. उद्या २५ डिसेंबर रोजी तापमान घटून १० अंश सेल्सीअसवर येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.येत्याा पाच दिवसांत किमान तापमान १० ते १४ अंश तर कमाल तापमान २९ ते ३२ अंश सेल्सीअस एवढे राहील, अशी माहिती हवामान तज्ज्ञ सचिन फड यांनी दिली.
हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी चांगला असल्याने काजू, बदाम, किसमिस, दुध खरेदीवर नागरीकांचा कल दिसून येत आहे. नंदुरबार शहरातील जीटीपी मैदान, वाघेश्वरी टेकडी, भोणे रोड, शनिमांडळ जवळील आयटीआय मैदान, सीबी गार्डन या परिसरात आता व्यायाम प्रेमी गुलाबी थंडीचा आनंद लूटीत मॉर्निंग वॉकसाठी नित्य नियमाने येत आहेत. सायंकाळी बाजारपेठ गजबजलेली असते तर रात्री अनेक भागात शुकशुकाट जाणवतो. शहरातील नगर पालिकेजवळ तसेच दंडपाणेश्वर रोडवर लोकरचे कपडे विक्रीसाठी थाटण्यात आलेल्या दुकानांवर ग्राहक वाढले आहेत. उबदार कपडे घेण्यासाठी आता ग्राहक सरसावले आहेत. गत वर्षी पाच अंश सेल्सिअसचे तापमान अनुभवलेल्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीची सवय झाली आहे. गत वर्षाच्या तुलनेत थंडी कमी असली तर यंदाच्या हंगामात दुस-यांदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरीक घेत आहेत.