नंदुरबार!Nandurbar/SKpublicvoice
सन 2019 या वर्षासाठी नोव्हेंबर व डिसेंबर 2021 मध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मैदानी चाचणी लेखी परीक्षा व वैद्यकीय तपासणी मध्ये उत्तीर्ण झालेले 14 पुरुष व 09 महिला उमेदवार असे एकूण 23 उमेदवार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नव्याने भरती झालेले आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या 14 पुरुष उमेदवारांनी दिनांक 29 मार्च 2022 रोजी शारीरिक व कायद्याच्या प्रशिक्षण घेण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे, तर महिला उमेदवारांना पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची ,सांगली येथे पाठविण्यात आले होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आलेले पोलीस अंमलदार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा नंदुरबार जिल्हा पोलीस दलात हजर झाले आहेत.
पोलीस प्रशिक्षण केंद्रात खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या पुरुष व महिला अंमलदारांची नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी भेट घेऊन त्यांना आपल्या दैनंदिन कर्तव्य बजावत असताना सर्वसामान्य जनतेचे लक्ष पोलिसांकडे असते ,पोलिसांची प्रत्येक कृती ही समाजावर परिणामकारक असते .त्यामुळे जनतेमध्ये काम करीत असताना पोलिसांची वर्तणूक नेहमी आदर्श व शिस्तप्रिय असावी. पोलीस दलात काम करीत असताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे तसेच दैनंदिन कर्तव्य पार पाडून स्वतःच्या आरोग्य कडे देखील तेवढेच लक्ष द्यावे.
नंदुरबार जिल्ह्याच्या नावलौकिक वाढविण्यासाठी प्रत्येक पोलीस अंमलदाराने त्या दृष्टीने प्रयत्न करावे.प्रशिक्षण घेऊन आलेल्या पोलिस अंमलदारांना पोलीस दलातील त्यांचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर व राखीव पोलीस निरीक्षक देवनाथ सिंग राजपूत हे उपस्थित होते.